आज एका कॉलेजमधील वैद्यकीय विद्यार्थ्यांना स्तनपानाबद्दल शिकवत असताना मी हे सांगितले.
स्तनपान म्हटले की सहसा डोळ्यासमोर आई आणि बाळाचे चित्र उभे राहते. पण खरं सांगायचं तर आपल्या सर्वांसाठीच स्तनपानाचा अनुभव हा आयुष्यात तीन वेळा भेटतो.
स्तनपान ही केवळ आईची जबाबदारी नाही आणि आई आणि बाबा दोघांनी मिळून स्तनपानासाठी पूरक वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे, तसेच स्तनपान योग्य प्रकारे देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे हे आपण बघितले आहे. स्तनपान देण्याचे काम जरी आई करत असली तरी तिला ते केवळ पतीच्या व कुटुंबियांच्या सहकार्यामुळे शक्य होते. त्यामुळे मी स्तनदा माता असे न समजता स्तनदा जोडी (जोडपे) ही संकल्पना जास्त योग्य समजते. त्यामुळे तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष, तुम्हाला स्तनपान तीन वेळा भेटू शकते.
आता बघूया स्तनपान आयुष्यात तीन वेळा कसे भेटते?
स्तनपानाची आणि आपली गाठ आपल्या जन्मासोबतच सुरू होते. सर्वसाधारणपणे आपल्या प्रत्येकाला स्तनपान घेण्याचा अनुभव आहे. अर्थात तेव्हा आपण बाळ होतो आणि त्यामुळे आपल्याला त्याविषयी फार कमी आठवते. ज्या मुलांना दोन वर्षाहून अधिक काळासाठी आईचे दूध मिळते त्या मुलांना मात्र आई सोबतच्या काही आठवणी राहू शकतात. अन्यथा आपली आई जे सांगेल त्यावरून आपल्या स्तनपानाचा प्रवास कसा झाला हे आपण समजून घेऊ शकतो. स्तनपानाची पहिली भेट ही परिस्थितीनुसार कधी छोटीशी तर कधी अनेक वर्ष चालणारी असते.
मला स्वतःला मी बाळ असताना स्तनपान जास्त मिळाले नाहीये. अर्थात माझ्या आईला हवा तो सपोर्ट मिळाला नसणार , मार्गदर्शन मिळाले नसणार आणि त्यामुळे अगदी सुरुवातीपासून मला बाटलीचे दूध देण्यात आले. आणि त्यामुळे जेव्हा मला स्वतःला आई झाल्यावर स्तनपान देताना अडचणी आल्या तेव्हा माझ्या आईजवळ बाटलीचा पर्याय उपलब्ध होता. मात्र मी स्तनपान सुरू ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले.
तुम्ही बाळ असताना तुमचा स्तनपानाचा कसा प्रवास होता हे माहित आहे का तुम्हाला?
स्तनपानाची दुसरी आणि महत्त्वाची भेट ही आपल्याला एखादे बाळ झाल्यानंतर होते . यावेळी मात्र स्तनपान व्यवस्थित व्हावे, बाळाचे नीट पोषण व्हावे याची जबाबदारी आपल्यावर असते. त्यामुळे कधी ही भेट आनंददायी असते तर कधी थोडीशी कष्टदायी. या भेटीच्या वेळी आपल्याला जेवढा सपोर्ट मिळेल, जेवढी मदत मिळेल, जेवढे मार्गदर्शन मिळेल, तेवढा स्तनपानाचा प्रवास हा मनासारखा होऊ शकतो.
स्तनपानाची दुसरी भेट ही देखील भली मोठी असते. आणि यावेळी आपल्याला सर्व अनुभव लक्षात देखील राहतात. हे अनुभव आपल्याला स्तनपान ही किती अद्भुत बाब आहे याची जाणीव देत राहतात.
2003 साली जेव्हा स्तनपानामध्ये मला अडचणी जाणवत होत्या तेव्हा ना त्यांची कारणे माहीत होती, ना त्या अडचणी दूर करण्याचे मार्ग. त्यावेळी इंटरनेटही सहज हाताशी नव्हते. त्यामुळे जेव्हा मला मेडिकल कॉलेजच्या वाचनालयामधील पुस्तके वाचून स्तनपानाविषयी अधिक माहिती घेता आली तेव्हा केवळ त्या माहितीमुळे माझा आत्मविश्वास वाढल्यानंतर तसेच तंत्र सुधारल्यामुळे दुधाचे प्रमाण वाढू शकते हे मला जाणवले.
आपली आणि स्तनपानाची तिसरी भेट मात्र आपल्या उतार वयामध्ये होते, जेव्हा आपण आजी-आजोबा बनतो. त्यावेळी आपल्याकडे स्तनपान देण्याचा तसेच अडचणी सोडवण्याचा काही ना काही अनुभव असतो आणि मग आपण त्या अनुभवावरून काही सल्ले नवीन आईला देतो. मात्र केवळ अनुभवावरून सांगितलेले सल्ले प्रत्येकासाठी योग्य असतील असे नाही. कारण प्रत्येक आई आणि बाळ यांची जोडी अगदी युनिक असते. अशावेळी स्तनपान विषयी पुन्हा सर्व अत्याधुनिक माहिती मिळवणे आणि गरज पडल्यास स्तनपान तज्ञांची मदत घेण्याचा सल्ला देणे हे आजी-आजोबांनी करायला हवे. आजी आजोबांच्या योग्य मार्गदर्शनामुळे प्रत्येक आई-बाबांचा स्तनपानाचा प्रवास हा यशस्वी होऊ शकतो. मात्र सपोर्ट शिवाय स्तनपान खूप अवघड जाते.
मी अजून या टप्प्यावर पोहोचायची आहे पण तुम्ही जर आयुष्यातील हे तीनही स्तनपान विषयक अनुभव घेतले असतील तर खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात.
वैद्यकीय विद्यार्थी जेव्हा स्तनपानाबद्दल शिकतात तेव्हा त्यांना स्वतःला याविषयी काही अनुभव नसतो. त्यामुळे हा शिक्षणातील एक भाग असल्याप्रमाणे ते शिकतात. मात्र जेव्हा ते स्वतः पालक बनतात तेव्हा वैद्यकीय व्यवसायाच्या स्वरूपामुळे त्यांचा स्वतःचा स्तनपान देण्याचा अनुभव हा थोडा कष्टदायक असू शकतो. मात्र बरेच डॉक्टर्स स्तनपानाविषयी अधिकाधिक माहिती घेऊन स्तनपानाचा प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न करतात.
आपल्या सर्वांच्या आयुष्यातील स्तनपान हा एक महत्त्वाचा भाग असल्याने आणि तो आपल्या आयुष्यात वारंवार येणार असल्याने आपल्या सर्वांनाच स्तनपानाविषयी मूलभूत माहिती असणं खूप आवश्यक आहे, हो ना?
आहे तुमची तयारी स्तनपानाचे बेसिक्स शिकण्याची? मग स्तनपानाची तुमची पुढची भेट नक्कीच आनंददायी होईल.
डॉ प्रिया प्रभू, मिरज
(२८/८/२४)

Leave a Reply