गेल्या दोन भागांमध्ये काही स्त्रियांना मिळालेले आणि त्यांच्या साठी महत्त्वाचे ठरलेले स्तनपानाबद्दलचे सल्ले कोणते हे आपण बघितले. या भागामध्ये पुढचे असेच उत्तम ५ सल्ले आपण बघूया.
तुमच्या स्तनपानाच्या प्रवासामध्ये यातील काही सल्ले नक्कीच तुमच्या कामी येतील.
11. Feed the baby when it wants to feed which might be every 2 minutes or every two hours.
हा सल्ला अतिशय महत्त्वाचा आहे. कारण बाळ जसं वाढतं , तसं बाळाचा वागणंही बदलतं. पण हे बदलतं वागणं जर आईला माहित नसेल तर कधी कधी आईला आपलं दूध कमी झालंय का , पुरत नाही का, अशा शंका येतात. विनाकारण वरचं दूध सुरू होतं आणि त्यामुळे आईचे दूध कमी व्हायला सुरुवात होते.
त्यामुळे हा एकच नियम लक्षात ठेवायचा. बाळाला डिमांड फीडिंग द्यायचं म्हणजे बाळाला हवं तेव्हा, हवा तेवढा वेळ ! मग बाळ आपल्याला दोन तासाने दूध मागते की अगदी थोड्याच वेळात दूध मागते याचा विचार करायचा नाही. बाळाच्या हुशारीवर विश्वास ठेवायचा. मिल्क ट्रान्सफर होतंय ना याची खात्री करायची आणि मग बाळाला हवं तसं हवं तेवढं पाजायचं!
12. The more they drink, the more you will make.
कधी कधी ना आईला सल्ला मिळतो , बाळाला दूध मिळावे म्हणून आईला सांगतात की ‘तू बाळाला थोडा वेळ पाजू नकोस. म्हणजे स्तनामध्ये दूध तयार होईल आणि बाळाला जास्त दूध मिळेल’
हा अतिशय चुकीचा सल्ला आहे.
जेव्हा स्तनामधलं दूध वेळोवेळी काढून स्तन रिकामे केले नाही तर दूध कमी होतं . त्यामुळे तुम्हाला आईचे दूध वाढवायचं असेल तर एकच महत्त्वाचा मार्ग आहे. ‘बाळाला वारंवार पाजा’ म्हणजे स्तनामध्ये जास्तीत जास्त दूध तयार होईल.
13. Move their body in the direction of their feet.
स्तनावर बाळाची योग्य पकड (good latch) यावी यासाठी नोज टू निप्पल (nose to nipple) हा नियम तुम्हाला माहित आहे ना? ( Perfect Latch बद्दलची पोस्ट इथे वाचता येईल)
आपण पाजताना सवयीने बाळाच्या तोंडासमोर निप्पल ठेवू शकतो पण असे केल्याने दूध पिताना बाळाचे नाक दबले जाते. त्यामुळे बाळाचे तोंड निपल समोर येऊ नये यासाठी मांडीवरच्या बाळाला बाळाच्या पायाच्या दिशेने थोडेसे सरकवले की मग बाळाचे नाक निपलच्या समोर येते आणि त्यामुळे बाळ मान थोडीशी वर करून स्तनावर पकड घेते आणि बाळाचं नाक दबलं जात नाही. ही अतिशय सोपी आयडिया लक्षात ठेवली की मग प्रत्येक वेळी योग्य पकड नक्कीच मिळवता येईल.
14. Remember to feed yourself to and drink lots and lots of water.
बाळाची काळजी घेताना स्वतःची काळजी घ्यायला आईने कधीही विसरायचं नाही. स्तनपान करण्यासाठी स्त्रीला खुप सार्या कॅलरीजची आवश्यकता असते.
त्यामुळे आईने वेळेवर आणि पोटभर खाणं, पौष्टिक अन्न खाणं, ताजं सकस अन्न खाणं अत्यावश्यक आहे.
सहा महिन्यापेक्षा लहान वयाच्या बाळांची पाण्याची गरज आईच्या दुधावाटेच भागवली जाते. त्यामुळे आईने भरपूर पाणी किंवा द्रव पदार्थ घेणे हेही अत्यावश्यक आहे.
समजा आईचे दूध वाढवायचं असेल तर एक मार्ग मी वर सांगितलाच आहे. दुसरा मार्ग आहे की आईने पुरेसं पाणी पिणे. तसेच स्तनपान सुरू करण्यापूर्वी पाणी पिऊन सुरू करणे किंवा मध्ये तहान लागल्यास पिण्यासाठी पाणी जवळ ठेवणे . असे छोटे छोटे उपाय देखील करता येतात.
15. It’s normal for your breasts to feel empty at times (or less full) but they are not so.
स्तनामध्ये जेव्हा दूध निर्मिती सुरू होते तेव्हापासून सुरुवातीच्या काही काळामध्ये स्तन दाटणे , ते दुधामुळे घट्ट होणे हे वारंवार घडते . मात्र जेव्हा बाळाची गरज ही आईच्या शरीराला व्यवस्थित लक्षात येते त्यानंतर दूध निर्मिती ही अगदी आवश्यकता असेल एवढीच होऊ लागते आणि मग आईचे स्तन दाटणे हे कमी होते.
अशावेळी काही स्त्रिया दूध कमी झाले असा गैरसमज करून घेऊ शकतात. मात्र स्तन मऊ असतील, विशेषतः संध्याकाळच्या वेळी किंवा बाळ तीन-चार महिन्याचे झाल्यानंतर , तर त्याचा अर्थ ‘आईचे दूध कमी झाले’ असे नसून ; आता आईच्या शरीराला ‘बाळाला दुधाची गरज नेमकी किती आहे ‘ याचा अंदाज आलाय आणि नेमके तेवढेच दूध तयार होते असा असू शकतो.
त्यामुळे स्तन मऊ असतील तरीही बाळाला पाजायला जवळ घ्या. पान्हा फुटला की दूध बाळापर्यंत नक्कीच पोहोचते. स्तनांमध्ये दूध निर्मिती ही सतत चालू असते त्यासाठी स्तनामध्ये दूध साठून राहण्याची काही गरज नसते. स्तन झरा असणाऱ्या विहिरीसारखे असतात , टाकीसारखे नाही. (याविषयी सविस्तर माहिती या पोस्ट मध्ये लिहिली आहे)
And bonus one !
म्हणजे मी आधीच्या पोस्ट्स मध्ये जरी प्रत्येकी पाच सल्ल्यांविषयी लिहिले असले तरी ही सल्ल्यांची शेवटची पोस्ट असल्याने एक एक्स्ट्रा सल्ला पण सांगेन!
16. A baby breastfeeds, a breastfeeding mother facilitates.
आपण बाहुबली बाळाच्या पोस्टमध्ये ‘आपलं बाळ कसं जन्मतः हुशार आहे’ याची माहिती घेतली होती प्रत्येक बाळामध्ये स्तनपान स्वतःहून सुरू करण्याची क्षमता जन्मतः असते याचीही पोस्ट वाचली असेल. त्यामुळे आईचं काम हे ‘बाळाच्या स्वतःच्या क्षमतांचा वापर करून बाळ स्तनपान करू शकेल याची काळजी घेणे ‘ आहे.
आईने संपूर्ण कंट्रोल न घेता बाळाच्या गरजेनुसार बाळाला सहाय्य करून स्तनपान करणे शक्य आहे. यासाठी ‘बाळाला वेगवेगळ्या प्रकारे कसे जवळ घेता येईल’ तसेच ‘ बाळाला स्तनावर व्यवस्थित पकड घेता यावी यासाठी काय काळजी घ्यायची’ या गोष्टी मात्र आईला माहित हव्या.
म्हणूनच लेड बॅक नर्सिंग पोझिशन असेल तर तिला नैसर्गिक पोझिशन असे म्हणतात ज्यामध्ये बाळाला जास्त स्वातंत्र्य असते. या वेगवेगळ्या पोझिशन्स किंवा होल्ड कोणते आहेत याबद्दलही लवकरच लिहीन.
स्तनपानाविषयी तसेच इतर काही महत्त्वाच्या आरोग्यविषयक माहितीसाठी या ब्लॉगला न विसरता सबस्क्राईब करा पुढील पोस्ट तुम्हाला इमेल मध्ये समजेलच.
स्तनपानाविषयी तुम्हाला मिळालेला किंवा या तीन सल्लाविषयक ३ पोस्ट मधला तुमचा आवडता सल्ला कोणता हे कमेंट मध्ये जरूर सांगा .
डॉ. प्रिया प्रभू मिरज

Leave a Reply