तुम्हाला दुधाचे प्रमाण वाढवायचंय? मग latch योग्य असायला हवा.
तुम्हाला बाळाचे वजन वाढवायचंय? मग latch व्यवस्थित हवा.
तुम्हाला निप्पलला जखमा होऊ नये असे वाटते? मग latchचुकता कामा नये.
बाळाला gases चा त्रास होतोय? latch सुधारला कि कमी होऊ शकेल.
अशी मी बरीच लिस्ट वाढवू शकेन पण तुम्ही माझ्या आधीच्या पोस्टदेखील वाचल्या असतील तर तुम्हाला latch म्हणजे बाळाची स्तनावरील पकड किती महत्वाची आहे हे लक्षात आले असेलच.
आजच्या पोस्टमध्ये योग्य पकड कधी मिळवायची याविषयी काही टिप्स सांगेन.
त्यापूर्वी आपले बाळ दुध पिताना योग्य पकड वापरत आहे ना या ओळखण्याच्या खुणा इथे या पोस्टमध्ये वाचू शकता, त्यानुसार निरीक्षण करा. बाळाकडे नैसर्गिक क्षमता असल्याने बरीच बाळे स्वतः योग्य पकड मिळवू शकतात. मात्र काही बाळांना विविध कारणाने यात अडचण येते. त्या अडचणी येऊ नयेत याचसाठी ही पोस्ट आहे. यामध्ये इतर लेख तसेच विविध भाषांमधील व्हिडीओ शेवटी दिले आहेत ते अवश्य पहा.
तसेच बाळाला जवळ घेण्याच्या विविध पद्धतींबद्दल देखील माहिती घ्या. याविषयी अजून या ब्लॉग वर लिहिले नाहीये. (लिहिल्यावर लिंक देईन) तोपर्यंत माझी फेसबुकवरील मराठी पोस्ट इथे वाचू शकता किंवा गुगल सर्च करून Breastfeeding Positions बाबत माहिती घ्या.
आता यापुढील माहिती – योग्य म्हणजे असमान, खोलवर पकड मिळवण्याच्या टिप्स
वर लिहिलेले दोन्ही शब्द खूप महत्वाचे आहेत.
योग्य पकड “असमान” (Asymmetric) असते– म्हणजे निप्पलच्या वरचा आणि खालचा काळा भाग समसमान तोंडात जाता कामा नये. निप्पलच्या खालचा areola बाळाच्या तोंडात जास्त प्रमाणात असावा आणि निप्पलच्या वरील areola मात्र मोकळा दिसायला हवा. यासाठी बाळ स्तनाजवळ आणताना निप्पलचे टोक बाळाच्या तोंडाजवळ नाही तर अक्षरशः नाकाजवळ असायला हवे. “Nose to nipple” हा मंत्र लक्षात ठेवायचा. बाळाची हनुवटी स्तनाला टेकली कि बाळ मान जराशी कलती करून आईकडे बघते. मात्र तुम्ही बाळाचे डोके हलायला डोके मोकळे सोडले नाही कि असे घडत नाही आणि बाळाचे नाक स्तनाला टेकते आणि latch चुकतो. तसेच बाळाला स्तनाजवळ धरताना स्तनापेक्षा थोडे खाली आणि स्तनाच्या विरुद्ध दिशेला थोडेसे अधिक सरकलेले हवे (माझ्या व्हिडीओ मध्ये हे दाखवले आहे. लिंक खाली दिलीये.) म्हणजे नाक निप्पलच्या समोर येते.
योग्य पकड “खोलवर (Deep)” देखील असते. – म्हणजे निप्पलचे टोक बाळाच्या तोंडामध्ये अगदी पडजीभ असते तिथपर्यंत पोचायला हवे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा बाळ केवळ निप्पल न चोखता स्तन चोखेल आणि areola चा भाग देखील तोंडामध्ये घेईल. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा बाळाला स्तन देताना आपण बाळाने तोंडाचा आ वासण्याची वाट बघू. निप्पल ने बाळाच्या वरच्या ओठांना स्पर्श करून बाळाने मोठा आ वासण्याची वाट बघायला हवी. बाळाने आ वासला कि लगेच बाळ स्तनाजवळ आणायचे, आईने पुढे झुकून स्तन तोंडात द्यायचा नाही. आई झुकली कि पाठदुखी मागे लागते. समजा latch योग्य झाला नाही तर करंगळीने बाळाचे तोंड उघडून स्तन सोडवायचा आणि पुन्हा प्रयत्न करायचा. सुरुवातीला वेळ लागू शकतो पण नंतर आई आणि बाळ दोघेही शिकतात. आणि असे प्रयत्न तेव्हाच शक्य आहेत जेव्हा तुम्ही बाळाने भुकेच्या खुणा दाखवायला सुरुवात केली कि बाळ रडण्यापूर्वी त्याला जवळ घ्याल. भुकेच्या खुणा सांगणारी पोस्ट अजून वाचली नाही का? ती इथे वाचायला मिळेल.

याखेरीज अजून काय काय करता येईल सांगू का?
बसून पाजत असाल तर आईने पाठीला व्यवस्थित सपोर्ट देऊन बसावे. latch जमल्यानंतर आवश्यक तेवढ्या उश्या वापरून बाळाला सपोर्ट द्यावा. latch जमण्यापूर्वी फीडिंग पिलो वापरला तर बाळ स्तनाहून अधिक उंच पातळीवर होऊ शकते. व latch चुकेल. फीडिंग पिलो उपयुक्त असला तरी अत्यावश्यक नाही याविषयी पोस्ट इथे वाचता येईल.
बाळ धरताना बाळाचे शरीर आईकडे संपूर्णपणे वळलेले हवे, केवळ डोके वळलेले नसावे. फक्त मान वळलेली असेल तर आपण काही पिऊ शकत नाही. करून बघा. “tummy to Mummy ” हा दुसरा मंत्र लक्षात ठेवावा. तसेच बाळ आईच्या अगदी जवळ असेल तर खोलवर पकड जमते. बाळाला जवळ ओढून घ्यावे. नवजात बाळे नाजूक व लहानशी असतात. एखादा दुपट्याचा स्तर देखील आई आणि बाळामध्ये अंतर आणून latch चुकवू शकतो.
ज्यांना शक्य असेल त्यांनी skin to skin म्हणजे अनावृत्त स्पर्श वापरावा. उघडे बाळ (डायपर/लंगोट घातलेले बरं का!) आईच्या उघड्या पोटावर ठेवून स्तनपान केल्यास बाळाच्या नैसर्गिक जाणीवा जागृत होऊन बाळ योग्य पकड घेण्यास प्रवृत्त होते. यासाठी थोडी प्रायवसी हवी. पूर्वी बाळंतीणीची खोली त्यासाठीच होती जेणेकरून आई व बाळ एकांतात राहू शकायचे. latch जमतच नसेल तर Laid back पोझिशन म्हणजे मागे रेलून बाळाला पोटावर ठेवून (कपड्यांसह वा विना-कपडे) पाजून पहा कारण हि नैसर्गिक पोझिशन आहे.
याखेरीज बाळाला जवळ घेण्याच्या विविध पोझिशन/ hold चा वापर करून बघू शकता पण वरील दोन मंत्र सर्व पोझिशन साठी वापरायचे. कोणते दोन मंत्र आठवतात ना? नसेल आठवत तर वरील भाग पुन्हा वाचा. सुधारित पाळणा (Cross cradle hold) आणि फुटबॉल hold नव्या मातेसाठी उपयुक्त आहेत. सीझर झाल्यास फुटबॉल hold आणि झोपून पाजणे उपयुक्त ठरू शकते.
बाळाला स्तन देताना काळ्या भागाजवळ आपली बोटे नाहीत याची खात्री करा. बऱ्याच वेळा बोटांचा व्ही आकार करून त्यामध्ये निप्पल पकडून आई बाळाला स्तन देते. असे केल्यास बाळ स्तन तोंडात घेऊ शकत नाही आणि केवळ निप्पल चोखते व निप्पल दुखावतात. स्तन धरताना हातांचा मोठा C सारखा आकार बनवायचा व स्तन निप्पलपासून दूर धरायचे. अंगठा स्तनांच्या वर आणि बोटे खाली असावीत.
बाळाला बाटली दिलेली असेल तर बाळ स्तन चोखण्याऐवजी बाटलीप्रमाणे निप्पल चोखते. अश्या बाळांना स्तनांची सवय करता येते पण त्याला वेळ लागतो. paced bottle feeding देऊन बाटलीची सवय सोडता येते. याविषयी पोस्ट इथे वाचता येतील.
बाळ खूप रडत असेल तर त्याला आपले स्वच्छ बोट चोखायला देऊन थोडे शांत करता येते. तसेच स्तनांमधून थोडेसे दुध काढून मग स्तन दिल्यास दुध लगेच येते आणि बाळ चिडून अधिक रडत नाही. व योग्य latch साठी प्रयत्न करता येतो.
स्तन दाटलेले असतील तर निप्पलदेखील घट्ट असल्याने बाळाच्या तोंडात लंबूळके होऊ शकत नाहीत. अश्या वेळी Reverse Pressure Softening तंत्र वापरून ते आधी मऊ करून मग latch साठी प्रयत्न करावा. याविषयी स्वतंत्र पोस्ट लिहीन. (नवीन पोस्ट लिहिली कि तुमच्या इमेल वर त्याची लिंक हवी असेल तर ब्लॉग ला subscribe करा किंवा पोस्ट लाईक करा. पुढील पोस्ट मिस होणार नाहीत. )
स्तनपान विषयक कोणतीही अडचण मातेला असेल तर डॉक्टरांनी देखील सर्वप्रथम latch योग्य आहे ना याचे निरीक्षण स्वतः करावे. योग्य नसल्यास latch दुरुस्त केला तर प्रोब्लेम्स देखील दूर होऊ शकतात आणि वरचे दुध सुरु करायची वेळ येत नाही. गरज भासल्यास Lactation consultant किंवा Lactation Counselor किंवा Lactation enablers यासाठी मदत करू शकतात.

जिला latchचे तंत्र जमले तिला स्तनपानदेखील जमले ! आणि हे सवयीने जमते.
(नाही जमले तर ऑनलाईन किंवा ऑफ लाईन मदत मिळावा. स्तनपानतज्ञ विषयी फेसबुक पोस्टची लिंक इथे आहे. तिच्या कमेंट मध्ये काही लिंक आहेत.)
latch योग्य आहे का हे आईने कसे तपासावे?

लेख:
वेगवेगळ्या पोझिशन वापरताना योग्य latch मिळवण्याबाबत इंग्रजी लेख : https://tinyurl.com/ykzlgwvn
NHS साईट वरील इंग्रजी लेख : https://tinyurl.com/267tujql
flipple तंत्राबाबत व्हिडीओ लिंक सह इंग्रजी लेख : https://themilkmeg.com/get-better-latch-exaggerated-latch-flipple-breastfeeding-technique/
फेसबुक वरील माझी मराठी पोस्त : https://www.facebook.com/priyadeshpande.prabhu/posts/6692053987491870
विविध व्हिडीओजची लिस्ट:
योग्य latch विषयी माहिती सांगणारा माझा मराठीतील व्हिडीओ https://youtu.be/9qLr3_EL9og (वेळ ६ मिनिटे )
योग्य आणि अयोग्य latch दाखवणारा इंग्रजी व्हिडीओ https://www.youtube.com/watch?v=wjt-Ashodw8&t=617s (वेळ १० मिनिटे )
दुखणारे निप्पल आणि योग्य latch याविषयी सांगणारा हिंदी व्हिडीओ https://www.youtube.com/watch?v=oxonUxaNUbA (वेळ ८ मिनिटे)
Flipple Technique वापरून latch व्हिडीओ (इंग्रजी) https://www.youtube.com/watch?v=0iZohdhAA1M (वेळ २ मिनिटे)

Leave a Reply