बाळाला रात्री स्तनपान द्यावे का?

बाळाला रात्री स्तनपान द्यावे का या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे!

तुम्हाला दुधाचे प्रमाण वाढवायचे आहे का? मग रात्री स्तनपान द्यायला हवे !

तुम्हाला बाळाचे वजन वाढवायचे आहे का ? मग रात्री स्तनपान द्यायला हवे!

तुम्हाला बाळाला रात्री झोपायची सवय लावायची आहे का? मग रात्री स्तनपान द्यायला हवे.

तुम्हाला breast engorgement होऊ नये असे वाटत असेल तर मग रात्री स्तनपान द्यायला हवे!

SIDS म्हणजे अचानक होणारा बाळाचा मृत्यू टाळायचा असेल तर रात्री स्तनपान द्यायला हवे!

प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळालंय पण आता माहिती पण हवी असेल तर मग पुढे वाचा! 😊

तुम्ही या आधीचे लेख वाचले असतील तर आता तुम्हाला माहित आहे की आपण स्तनपान करताना जास्तीतजास्त निसर्गाच्या नियमानुसार केले की अडचणी येत नाहीत. आणि हेही माहीत आहे की बाळ जन्माला येताना बऱ्याच क्षमता घेऊन जन्माला येते . यामध्ये विविध प्रतिक्षिप्त क्रिया (neonatal reflexes) तर आहेतच पण त्याशिवाय कधी , कसे व किती दूध प्यायचे हे बाळाला बरोब्बर समजते!

अभ्यासांमधून असे लक्षात आले आहे की आईच्या दुधातील चरबी (फॅट्स)चे प्रमाण संध्याकाळनंतर जास्त असते. अधिक कॅलरी देणारे हे दूध बाळांना आवडते. तसेच या दुधामुळे वजन देखील वाढते ! दिवसभरातील संपूर्ण पोषणांपैकी जवळजवळ १/३ पोषण हे रात्रीच्या वेळी बाळांना मिळते!

आईचे दूध “मागणी तसा पुरवठा” या तत्वावर चालते हे कधीच विसरायचे नाही. बाळ रात्रीच्या वेळी स्तन्य पीत नसेल तर स्तन रिकामे होणार नाहीत आणि मग आईचे दूध कमी होण्यास सुरुवात होईल . त्यामुळे दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी व दुध टिकवून ठेवण्यासाठी रात्री स्तन रिकामे व्हायला हवेत. बाळ जन्मल्यावर सुरुवातीचे काही दिवस दर २-३ तासांनी रात्री देखील बाळाला पाजवायला हवे, गरज पडल्यास बाळाला उठवायलाही हवे ! २ आठवड्यानंतर रात्री बाळाला स्वतःहून न उठवता बाळ दूध मागेल (रडेल) तेव्हा द्यायला हरकत नाही!

दूध निर्मितीसाठी prolactine हार्मोन आवश्यक असते व या हार्मोनचे प्रमाण रात्रीच्या वेळी अधिक असते. त्यामुळे दुधनिर्मिती देखील अधिक असते. ज्या मातांना दूध वाढवायचे आहे त्यांनी रात्रीच्या वेळी दर २-३ तासांनी पंपने किंवा हाताने दूध काढावे जे साठवून ठेवले तर फॉर्म्युला देण्याऐवजी ते दूध बाळाला देता येईल. बाळ latch करून स्वतः पीत असेल तर उत्तमच! Prolactine चे प्रमाण जास्त असल्याने तसेच रात्री आई शांत असल्याने पान्हा विनासायास फुटतो आणि बाळ सहजपणे दूध पिऊ शकते .

रात्री आईचे दूध सहजपणे व भरपूर मिळत असल्याने आपले हुशार बाळ संध्याकाळ नंतर वारंवार दूध मागू लागते . अश्यावेळी आईने बाळाला हवे तेवढे दूध पाजले तर आईचे दूध वाढण्यास फायदा होतो. पण बबाळ रात्री झोपावे म्हणून वरचे दूध किंवा फॉर्म्युला दिला की बाळ तर झोपते पण स्तन रिकामे न झाल्याने आईचे दूध झपाट्याने कमी होऊ लागते. आणि आईला समजत नाही दूध कमी का होतंय !

याखेरीज रात्रीच्या दुधामध्ये treptophan नावाचे अमायनो ऍसिड जास्त प्रमाणात असते . रात्री झोप येण्यासाठी आवश्यक असणारे melatonin तयार होण्यासाठी याची आवश्यकता असते. २ महिन्याहुन लहान बाळांमध्ये दिवस व रात्र हे फरक ओळखणारे अंतर्गत घड्याळ अजून विकसित झालेले नसते. पण आईच्या दुधामधून melatonin व tryptophan बाळाला मिळते आणि रात्री झोपण्याची सवय लागण्यास व घड्याळ विकसित होण्यास सुरुवात होते.

बाळ जेव्हा रात्री दूध घेण्यासाठी उठते तेव्हा ते SIDS पासून अधिक सुरक्षित होते आणि आईला देखील स्तन दाटण्यापासून व दुधाच्या गाठी होण्याचा धोकाही कमी होतो .

रात्री बाळाला दूध पाजायचे असेल तर त्यामुळे आईची झोप व्यवस्थित होत नाही. खरे तर यामुळेच आई किंवा कुटुंबीय बाळाला जास्त वेळ झोपवण्याचे मार्ग शोधत असतात! आणि नकळत दूध कमी होऊन जाते. यासाठी बाळाला झोपून पाजवण्याचे तंत्र आईला जमले तर रात्री उठून बसून पाजण्याचा ताण कमी होऊन आईला देखील विश्रांती मिळू शकते. पण अनेक गैरसमजुतींमुळे झोपून पाजण्याबद्दल विचार केला जात नाही. पण बाळाला कमीतकमी दोन वर्षे स्तनपान देऊन आयुष्याची सर्वोत्तम व आरोग्यदायी सुरुवात द्यायची असेल तर रात्री झोपून पाजणे शिकायला हवे! वरील फोटोमध्ये काही उपाय आहेत जे आईला विश्रांती घेण्यास मदत करतील .

रात्रीच्या स्तनपानाविषयी इंग्लंड मधील ‘ला लाशे लीग’च्या वेबसाईटवर ही सविस्तर माहिती आहे! रात्री स्तनपान देण्याचे कसे फायदे आहेत याबद्दल या साईट वर देखील वाचू शकता ! आणि या लेखामध्ये छान पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या आहेत! बाळाने रात्रभर झोपावे हे चुकीचे गृहीतक आहे याविषयी हा लेख आहे !

बाळाला रात्री पाजावे लागते म्हणून वैतागू नका! बाळ थोडे मोठे झाले की झोपून पाजण्याच्या पद्धतीमुळे तुमचीदेखील झोप पूर्ण होईल! बाळाच्या जन्मानंतर दूध वाढवण्यासाठी रात्री देखील पाजणे आवश्यक आहे! बाळाला हवे तेव्हा व हवे तितके दूध पाजणे हे आपले काम आहे ,बाकी निसर्ग बघून घेईल ना!

आता यानंतर तुम्ही एखाद्या नव्या बाळाला बघायला कोणाकडे जाल तेव्हा “बाळ रात्री झोपतंय ना? ” असा प्रश्न कधीही विचारू नका! “बाळ रात्री व्यवस्थित दूध पिते ना? ” असा नवा प्रश्न विचारुया आणि थकलेल्या आईचे मनापासून कौतुक करूया! कारण स्तनपान देणे हे खरेतर कष्टाचे काम आहे! त्यामुळे आईला आपणा सर्वांना सर्वतोपरी मदत करायला हवी !

डॉ. प्रिया प्रभू (MD)

drprdeshpande2@gmail.com


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com