कालच्या व्हिटॅमिन डी बद्दलच्या पोस्ट मध्ये कबूल केल्याप्रमाणे आज या जादूच्या छडीबद्दल माहिती ऐका! याविषयी फार कमी लोकांना माहीत आहे आणि हा लेख वाचला की तुम्ही त्या गटामध्ये सामील व्हाल ! अतिशय साधे सोपे टेक्निक आहे पण एकाहून अधिक अडचणी दूर करते!
ब्रेस्ट कॉम्प्रेशनचा वापर केल्यास कोणत्या अडचणी दूर होतात?
दूध कमी येतंय, ब्रेस्ट कॉम्प्रेशन वापरा, दूध वाढेल! बाळाचे वजन वाढत नाहीये , ब्रेस्ट कॉम्प्रेशन वापरा, वाढू शकेल! दूध पंप करून काढून ठेवायचंय, ब्रेस्ट कॉम्प्रेशन ने गती वाढेल ! बाळ दूध पिता पिता झोपी जातंय , ब्रेस्ट कॉम्प्रेशन वापरा , पुन्हा जागे होईल ! स्तन दाटलेत , ब्रेस्ट कॉम्प्रेशन वापरा , हलके वाटेल! बाळाला जन्मतः कावीळ आहे, ब्रेस्ट कॉम्प्रेशन वापरा , कावीळ लवकर कमी होण्यास मदत मिळेल ! पहिल्या आठवड्यात कमी होणारे बाळाचे वजन वाढवायचंय, ब्रेस्ट कॉम्प्रेशन वापरा , मदत होईल ! बाळ खूप वेळ स्तनपान करतंय, ब्रेस्ट कॉम्प्रेशन वापरा , स्तन लवकर सोडेल! बाळ अशक्त, अपुऱ्या वजनाचे असल्याने स्तनपान करताना दमते, ब्रेस्ट कॉम्प्रेशन करा, बाळाला मदत होईल!
ब्रेस्ट कॉम्प्रेशन ही जादूची छडी आहे तरी काय ?

ब्रेस्ट कॉम्प्रेशन म्हणजे “बाळ पीत असताना किंवा पंप करत असताना स्तनाला हाताने दाबणे”. जशी टूथपेस्ट काढण्यासाठी पेस्ट च्या मागील बाजूस दाबून आपण पेस्ट काढतो त्याप्रमाणे स्तनाच्या मागील बाजूस दाबून अधिक दूध बाहेर येण्यास मदत करणे ! (फोटो पहा )
ब्रेस्ट कॉम्प्रेशन कसे करावे?
ब्रेस्ट कॉम्प्रेशन करण्यापूर्वी बाळाची स्तनावरील पकड ( Latch) योग्य आहे याची खात्री करून घ्या . स्तनपान करताना बाळाकडे बघा. स्तनपान संपत येते तेव्हा बाळ स्तन चोखणे बंद करते मात्र स्तन सोडत नाही. अश्या वेळी स्तनाची मागील बाजू दुसऱ्या हाताच्या अंगठा व बोटे यांच्या मध्ये धरून (फोटो व व्हिडीओ बघा ) स्तन दाबावेत (दुखेपर्यंत दाबू नये) . असे केल्याने स्तनांच्या मागील बाजूस असलेले दूध बाहेर येते आणि बाळाला दाट दूध मिळते . काही वेळा कॉम्प्रेशन केल्यावर दूध निघत नाही तेव्हा जागा बदलून कॉम्प्रेशन करता येते .
ब्रेस्ट कॉम्प्रेशन करताना काय काळजी घ्यावी?
सर्वप्रथम स्तनावरील पकड व्यवस्थित आहे आणि मिल्क ट्रान्सफर होत आहे याची खात्री करून घ्यावी ! (याबद्दल लेख लवकरच लिहीन) स्तनावरील दाब हा सतत देऊ नये अन्यथा दुधाच्या गाठी होऊ शकतील . बाळ पीत नसताना दाब द्यावा आणि बाळाने पिणे सुरू केले की थांबावे . दाब देऊनही बाळाने पिणे सुरू केले नाही तर दाब देण्याची जागा बदलावी. नवीन आईला समजा स्वतः योग्य वेळी दाब देणे जमत नसेल तर जोडीदार किंवा इतर कौटुंबिक मदतनीस (जी सहसा आज्जी असते) यांनी दाब देण्यास मदत करावी. मात्र यानंतरही अडचणी दूर झाल्या नसतील तर आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी.
या ब्रेस्ट कॉम्प्रेशन पद्धतीची माहिती प्रत्येक गरोदर स्त्री, प्रत्येक स्तनदा माता , प्रत्येक आज्जी, प्रत्येक जोडीदार आणि प्रत्येक डॉक्टर ला असायला हवी ! पोचवाल का ही माहिती सर्वांपर्यंत ?
डॉ. प्रिया प्रभू .
अधिक माहितीसाठी लेख व व्हिडीओ ची लिंक ( आणि हो, तुमच्या प्रश्नांचे स्वागत आहे)

Leave a Reply