मुलांनी मानसिक त्रास सांगितल्यावर पालकांनी नेमके बोलायचे कसे?

Published on

in

, , ,


“आई, मला आतून खूप भीती वाटतेय…” किंवा “बाबा, माझं काहीच नीट चाललेलं नाहीये…”


जेव्हा तुमचं मूल, मग ते शाळेत जाणारे असो किंवा वयात आलेलं तरुण असो, अचानक तुमच्यासमोर येऊन स्वतःच्या मानसिक अस्वस्थतेबद्दल बोलतं, तेव्हा तो क्षण एका पालकासाठी अत्यंत नाजूक आणि परीक्षेचा असतो.


अहो इथे सर्व डॉक्टरांना देखील मानसिक आरोग्याविषयी जुजबी माहिती असते, डॉक्टरांमध्ये आत्महत्येचा धोका जास्त असतो तर सर्वसामान्यांना अश्या वेळी नेमके कसे बोलावे याची कशी कल्पना असणार, नाही का?

गेल्या काही पोस्ट/ reels मध्ये मी काळजीवाहक / कुटुंबीय यांनी काय बोलू नये हे सांगितले. उदा. Lecture देऊ नये, लगेच उपाय सुचवू नये, स्वतःचा त्रास रुग्णाला सांगत बसू नये इ. आज आपण अश्या वेळी आपण पालकांनी काय करायला हवे ते बघूया.

पालक म्हणून आपली पहिली प्रतिक्रिया काय असावी? हे समजून घेण्याआधी मुलांच्या मनातील कश्मकश समजून घेणं गरजेचं आहे. अनेक विद्यार्थ्यांशी बोलताना मला हे जाणवले आहे.

मास्किंग’चा (Masking) थकवणारा मुखवटा

तुमच्यासमोर स्वतःचं मन मोकळं करण्याआधी, तुमच्या मुलाने कित्येक महिने किंवा वर्ष ‘मास्किंग’ केलेलं असतं. मास्किंग म्हणजे घरात, शाळेत किंवा मित्रांमध्ये अगदी नॉर्मल, हसतमुख आणि ‘सगळं काही ठीक आहे’ असं दाखवण्याचा खोटा आव आणणे.
“मी जर माझं दुःख दाखवलं, तर लोक मला कमकुवत मानतील किंवा दुखावले जातील” या भीतीने मुले स्वतःच्या मानसिक त्रासावर हसणारा मुखवटा चढवून फिरत राहतात. हा मुखवटा रोज घालून फिरणं त्यांना आतून पूर्णपणे पिळून काढतं.

आई-वडिलांना जपण्याची धडपड आणि अपराधीपणा (Guilt)

मुले हा मुखवटा फक्त समाजासाठी नाही, तर विशेषतः तुमच्यासाठी घालून असतात. त्यांना आपल्या आई-वडिलांची काळजी असते. “माझ्या या त्रासाने आई-बाबांचे मन दुखावेल”, “त्यांना उगीच माझं टेन्शन येईल” या भावनेपोटी ती स्वतःचं दुःख आतल्या आत दाबून ठेवतात. कधीकधी ओरडा बसेल अशी भीतीही असते.
जेव्हा हा त्रास सहनशक्तीच्या पलीकडे जातो आणि ती शेवटी तुमच्याशी बोलतात, तेव्हा त्यांच्या मनात प्रचंड अपराधीपणाची भावना (Guilt) असते. त्यांना सतत वाटत असतं की आपण आपल्या पालकांवर एक ओझं बनलो आहोत.
पालकांच्या अपेक्षा मुलांना माहीत असतात कारण त्या आपणच वारंवार सांगितलेल्या असतात. आपल्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग होणार याचेही त्यांना दुःख असते.

अशा वेळी पालकांनी मुलाला कसं ‘सांभाळावं’? (How to hold them)

Hold them हा शब्द आवडतो मला. कारण यामध्ये त्यांना त्यांच्या वेदनेसह आपल्या मनात जागा देण्याची भावना येते आणि सुरक्षितता देण्याची भावना येते.

जेव्हा तुमचं मूल असा संवाद सुरू करतं, तेव्हा काळजीपोटी किंवा भीतीपोटी लगेच “तुला कशाची कमी पडू दिलीये?”, “पॉझिटिव्ह विचार कर”, “फोन वापरणं बंद कर म्हणजे सगळं ठीक होईल” ” जरा व्यायाम करत जा”, ” मित्रांना भेट रोज”  असे सल्ले देण्याची घाई करू नका. हे सल्ले नकळत त्यांचा अपराधीपणा अधिक वाढवतात.

त्याऐवजी:

त्यांच्या भावना फेटाळू नका (Validate their pain):
सर्वात आधी त्यांना शांतपणे ऐका. “तू माझ्याशी हे बोलायचं धैर्य दाखवलंस, याचा मला अभिमान आहे” एवढं एक वाक्यही त्यांच्या मनावरचा अर्धा भार हलका करतं.

अपराधीपणा काढून टाका:
त्यांना स्पष्ट सांगा— “तुझ्या या त्रासामुळे आमचं नुकसान होत नाहीये. तू आमच्यावर कोणतंही ओझं नाहीस. तुझं मानसिक आरोग्य आमच्यासाठी कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचं आहे.” तुम्ही चिडला किंवा रागावला नाहीये , नाराज नाहीये हे ऐकून त्यांच्या मनावरील ओझे कमी होते.

✓’फिक्सर’ बनण्यापेक्षा सुरक्षा कवच’ बना:
लगेच उपाय देण्यापेक्षा किंवा उत्तरं शोधण्यापेक्षा, फक्त त्यांना प्रेमाने जवळ घ्या. “हा त्रास कसा कमी करायचा ते आपण दोघं मिळून, डॉक्टरांची किंवा समुपदेशकांची मदत घेऊन ठरवू, तू या लढ्यात एकटा नाहीस” हा विश्वास त्यांना द्या.

जेव्हा एखादं मूल स्वतःचा ‘मास्क’ काढून तुमच्यासमोर दुःख उघडं करतं, तेव्हा तो त्यांनी तुमच्यावर दाखवलेला जगातील सर्वात मोठा विश्वास असतो.
त्या विश्वासाला भीती किंवा रागाने उत्तर न देता, फक्त प्रेमाने आणि सहानुभूतीने कवेत घ्या.

पालक म्हणून मुलांशी त्यांच्या मानसिक आरोग्यावर बोलताना तुम्हाला वैयक्तिकरीत्या सर्वात जास्त कोणती अडचण किंवा भीती जाणवते? कमेंटमध्ये अवश्य सांगा.
अजून कश्याविषयी माहिती घ्यायला आवडेल तुम्हाला?

डॉ प्रिया प्रभू, मिरज
(१३/९/२०२६)

WA channel वर आधीचे लेख एकत्रित सापडतील.


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com