पेरीमेनोपॉज (रजोनिवृत्ती-पूर्व काळ) – लक्षणे व उपचार

Advertisements


“माझ्या पाळीचं वेळापत्रक बिघडायला लागलंय, कधी लवकर, कधी उशिरा येतेय.”
“हल्ली फार चिडचिड होते, लहानसहान गोष्टींनी त्रास होतो.”
“रात्री झोपच लागत नाही, सतत अस्वस्थ वाटतं.”

तुमच्याही मनात असे प्रश्न येत आहेत का? जर हो, तर पेरीमेनोपॉज (Perimenopause) म्हणजेच मेनोपॉजपूर्व काळ सुरू झाला असण्याची शक्यता आहे.
मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती . स्त्रीची पाळी जेव्हा थांबते तेव्हा त्याला रजोनिवृत्ती असे म्हणतात.

ही काही आजाराची अवस्था नसून, स्त्रीच्या शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांचा एक भाग आहे. परंतु, या काळात होणारे शारीरिक आणि मानसिक बदल समजून घेतले तर हा टप्पा अधिक सुसह्य होऊ शकतो. चला, तर मग पेरीमेनोपॉजबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

पेरीमेनोपॉज म्हणजे काय?
जेव्हा सलग १२ महिने पाळी येणं थांबते, तेव्हा त्या स्त्रीला ‘मेनोपॉज’ झाल्याचं समजलं जातं. तत्पूर्वी स्त्रीच्या शरीरात संप्रेरकांमध्ये (Hormones) बदल होतात आणि मासिक पाळी अनियमित होऊ लागते, तो काळ ‘पेरीमेनोपॉज’ म्हणतात.

ही अवस्था मेनोपॉजच्या काही वर्ष आधी सुरू होते आणि सरासरी ४ ते १० वर्षे टिकते. म्हणजेच ही अवस्था सुरू होण्याचे कोणते ठराविक वय असे नाही.

या काळात शरीरात इस्ट्रोजेन (Estrogen) आणि प्रोजेस्टरॉन (Progesterone) या संप्रेरकांची पातळी कमी-जास्त होत राहते, त्यामुळे अनेक प्रकारची लक्षणं जाणवतात.

भारतीय स्त्रीमध्ये मेनोपॉज होण्याचे सरासरी वय 46 ते 50 असे आहे. म्हणजेच पेरीमेनोपॉजची सुरुवात साधारण 35 ते 40 वयापासून होऊ शकते. याची सुरुवात कमी वयात होते याची जाणीव बऱ्याच जणांना नसते.

ती लक्षणे सौम्य असल्यास केवळ स्त्रीला त्रास होतो. मात्र लक्षणांचे प्रमाण जास्त असल्यास कुटुंबीयांना देखील ती जाणवतात आणि बऱ्याचदा आई / पत्नीचा स्वभाव बदललाय असे त्यांना वाटू शकते. मात्र याचे कारण न समजल्याने विसंवाद निर्माण होऊ शकतो.

पेरीमेनोपॉजची लक्षणं

१. शारीरिक लक्षणं

✓ मासिक पाळी अनियमित होणे – कधी लवकर, कधी उशिरा, कधी खूप रक्तस्त्राव, कधी अगदी कमी. कधी पाळी पंधरा-वीस दिवस देखील सुरू राहू शकते. अत्याधिक रक्तस्त्राव झाल्याने रक्तक्षयाचा देखील त्रास होऊ शकतो. तसेच अनियमित पाळीमुळे तणाव देखील निर्माण होऊ शकतो.

✓ गरम झणझण (Hot Flashes) – शरीरातून अचानक गरमी जाणवणं आणि घाम येणं. अशावेळी जास्त काही सुचत नाही.

✓रात्री घाम येणे आणि झोपेच्या समस्या – रात्री अस्वस्थ वाटणं आणि चांगली झोप न लागणे त्यामुळे दिवसभर देखील थकवा राहू शकतो.

✓ थकवा आणि शक्ती कमी होणे – सतत दमल्यासारखं वाटणं.

✓ हाडं कमजोर होणे – इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे हाडांची ताकद कमी होते आणि भविष्यात ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो.

✓ वजन वाढणे – संप्रेरकातील बदलांमुळे वजन देखील वाढते.

✓ त्वचेचे बदल आणि केस गळणे – त्वचा कोरडी पडणे आणि केस गळण्याची समस्या वाढणे.

✓ लैंगिक इच्छा कमी होणे (Low Libido) – शरीरातील संप्रेरकांच्या बदलांमुळे काही महिलांना याचा अनुभव येतो.

२. मानसिक आणि भावनिक लक्षणं

✓ चिडचिड आणि मनःस्थितीमध्ये वारंवार बदल (Mood Swings)
कौटुंबिक नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो.

✓ सतत काळजी वाटणे आणि नैराश्य येणे (Anxiety & Depression)
रडण्याचे किंवा दु:खी राहण्याचे प्रमाण वाढू शकते.

✓ एकाग्रता आणि स्मरणशक्ती कमी होणे (Brain Fog)
नेहमीची कामे करण्यामध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी कामे करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात.


पेरीमेनोपॉज दरम्यान घ्यावयाची काळजी

१. आहारात बदल करा
स्त्रिया सहसा स्वतःच्या आहाराकडे लक्ष देत नाहीत, मात्र याबाबत काळजी घ्यायला हवी.
✔ संतुलित आहार घ्या – हिरव्या पालेभाज्या, दूध, दही, फळं, कडधान्य यांचा समावेश करा.
✔ प्रथिने आणि फायबर वाढवा – डाळी, अंडी, सोयाबीन आणि बदाम यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
✔ कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D महत्त्वाचे – हाडं मजबूत राहण्यासाठी दूध, सूर्यप्रकाश याचा फायदा होतो.
✔ साखर आणि जास्त तेलकट पदार्थ टाळा – रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

२. व्यायाम करा

✔ दररोज ३० मिनिटं चालणं, योग किंवा स्ट्रेचिंग करा.
✔ ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा (Meditation) आणि श्वसनाचे व्यायाम (Breathing Exercises) उपयुक्त ठरतात.
✔ हाडं मजबूत ठेवण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा योगासने फायदेशीर ठरतात.

३. पुरेशी झोप घ्या

✔ झोपेचं ठराविक वेळापत्रक ठेवा आणि रात्री ७-८ तास झोप मिळेल याची काळजी घ्या.
✔ झोपताना मोबाईल किंवा टीव्ही न बघता, शांत वातावरण तयार करा.
✔ झोपण्यापूर्वी गरम दूध किंवा गार पाणी प्या, हलकी गाणी ऐका किंवा पुस्तक वाचा.

४. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या

✔ तणाव कमी करण्यासाठी कुटुंबीय व मैत्रिणींशी बोलत राहा.
✔ कधीकधी ताणतणाव जास्त वाढला तर मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
✔ स्वतःसाठी वेळ काढा, छंद जोपासा आणि मन रमवण्यासाठी आनंदी गोष्टी करा.

पेरीमेनोपॉजमध्ये डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा?

✔ खूप जास्त रक्तस्राव होत असेल किंवा पाळी खूप अनियमित झाली असेल.
✔ रात्री झोप लागत नसेल किंवा नैराश्य (Depression) जाणवत असेल.
✔ गरम झणझण, हृदयाचे ठोके वाढणे यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल.
✔ हाडं ठिसूळ होत असल्याचं जाणवत असेल किंवा सांधेदुखी जास्त होत असेल.

डॉक्टर उपचारासाठी पुढील गोष्टी सुचवू शकतात:

1. हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) – इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे होणारे त्रास कमी करण्यासाठी ही थेरपी दिली जाते.
2. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D सप्लिमेंट्स – हाडं मजबूत ठेवण्यासाठी.
3. प्राकृतिक उपाय आणि औषधोपचार – झोप आणि मानसिक आरोग्यासाठी काही नैसर्गिक उपाय सुचवले जातात.

कुटुंबाची भूमिका महत्त्वाची

पेरीमेनोपॉजमधील स्त्रियांना कुटुंबाने आणि जोडीदाराने समजून घेणं फार महत्त्वाचं आहे.
✔ तिच्या चिडचिडीकडे दुर्लक्ष न करता प्रेमाने संवाद साधा.
✔ तिच्या तब्येतीबद्दल विचारपूस करा आणि मदतीला पुढे या.
✔ तिच्या गरजांबद्दल जागरूक राहा आणि तिला स्वतःसाठी वेळ घ्यायला सांगा.
✔ जर ती मानसिक तणावात असेल तर तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करा.

पेरीमेनोपॉज हा आयुष्याचा एक नैसर्गिक टप्पा आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतो. आहार, व्यायाम, पुरेशी झोप आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर हा काळ सहज पार करता येतो.
जर काही त्रास जाणवत असेल दुर्लक्ष न करता, तर स्त्री रोग तज्ञांचा सल्ला घ्या आणि योग्य उपचार घ्या. स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्या आणि आनंदी राहा!

डॉ प्रिया प्रभू, मिरज

Image source – Hotandbothered.co.uk

हा लेख यापूर्वी श्रेष्ठ महाराष्ट्र या साइटवर प्रसिद्ध झाला होता. लिंक

माहितीपूर्ण blog link


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com

Exit mobile version