#Mental_Wellbeing_DrPriya 44
मॉक ड्रिलची बातमी आली आणि माझ्या एका सहकर्मचाऱ्याने त्यांची पुण्याची ट्रीप कॅन्सल केली कारण पुण्यामध्ये मॉक ड्रिल होईल किंवा आपण अडकू अशी त्यांना भीती वाटली.
माझ्या एका स्टूडेंटने “रात्री झोप लागत नाहीये कारण युद्धामुळे चिंता सतावतेय” असे सांगितले.
आपल्याला भीती वाटत आहे हे सांगण्याची देखील सध्या भीती वाटू शकते , त्यामुळे बरेच जण हा त्रास सहन करण्याचा प्रयत्न करत असतील.
कोविड काळामध्ये भीती वाटत होती आणि पोस्ट वाचल्यानंतर बरे वाटत होते असे बऱ्याच जणांनी कोविड काळ संपल्यानंतर मला सांगितले.
*कोणतेही मोठे संकट येते किंवा विशेषतः जेव्हा युद्धासारखे संकट येते त्यावेळेला अशा प्रकारे चिंतातुरता ( चिंताग्रस्तता ) जाणवू शकते हे यापूर्वी अनेक वेळा दिसून आलेले आहे.*
विशेषतः ज्यांना anxiety म्हणजे चिंताविकार आहे अशा लोकांना या काळामध्ये अधिक त्रास जाणवू शकतो. ज्यांना यापूर्वी काही त्रास जाणवला नव्हता अशांना देखील भीती- अस्वस्थता वाटू शकते.
*सर्वप्रथम हे लक्षात घ्या की जर तुम्हाला अशा भावना जाणवत असतील तर यामध्ये कोणताही कमीपणा नाही.* हा असाधारण प्रसंग आहे त्यामुळे सध्या अनिश्चितता असल्याने ज्यांना अतिविचार करण्याची सवय आहे किंवा ज्या व्यक्ती अधिक भावनात्मक आहेत अशा व्यक्तींना हा त्रास सहजपणे जाणवू शकतो. या भीतीच्या भावनेचा कोणताही कमीपणा मानू नका.
*यामध्ये कोणत्या भावना मनात येतात?*
भीती वाटू शकते, भविष्यात काय होणार याची चिंता होऊ शकते, आपल्या जवळच्या व्यक्तींची चिंता होऊ शकते, जर कोणी ओळखीचे सैन्यात असतील किंवा युद्धाच्या भागांमध्ये राहत असतील तर त्यांची चिंता होऊ शकते, भविष्यातील नोकरी किंवा इतर संकटांबाबत काळजी वाटू शकते.
यामध्ये छातीत धडधडणे, पोटामध्ये मळमळ होण्यासारखा त्रास, श्वास घेण्यास त्रास होणे, अंगातील शक्ती कमी झाल्यासारखे वाटणे, बातम्या वाचताना किंवा ऐकताना त्रास होणे, डोके दुखणे असा कोणताही त्रास वाटू शकतो.
ही चिंता तुमच्या मनामध्येच असू शकते कधी कधी शरीरामध्ये दिसू शकते किंवा मन आणि शरीर अशा दोन्ही ठिकाणी याची लक्षणे दिसू शकतात.
*War anxiety कोणाला होऊ शकते ?*
समज असणाऱ्या लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत देखील याची लक्षणे दिसू शकतात.
विशेषतः जर कोणाला आयुष्यात पूर्वी संकटांचा सामना करावा लागला असेल किंवा युद्ध काळ किंवा दंगल यासारख्या प्रकाराला सामोरे जावे लागले असेल तर त्या व्यक्तींना अधिक त्रास होऊ शकतो.
ज्यांना त्रास होतोय अशा व्यक्ती याविषयी बोलू शकतीलच असे नाही. त्यामुळे जर तुम्हाला असे वाटले तर याबाबत इतरांना मदत करणे आवश्यक आहे. तसेच तुम्हाला स्वतःला जर हा त्रास जाणवत असेल तर त्यासाठी मदत मिळवणे देखील आवश्यक आहे.
*असा त्रास होत असल्यास काय करावे?*
सोबतच्या फोटोमध्ये काही महत्त्वाचे उपाय सांगितलेले आहेत. तसेच कमेंट मध्ये एक लिंक देत आहे ज्यामध्ये उपाय सांगितलेले आहेत.
तसेच कमेंट मध्ये एका माहितीपुस्तिकेची लिंक देखील देत आहे. ज्यामध्ये लहान मुलांशी जर युद्धाविषयी बोलायचे असेल किंवा त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी मदत करायची असेल तर काय करता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन आहे.
*काही महत्त्वाचे उपाय पुढीलप्रमाणे -*
*1. युद्धाच्या किती बातम्या वाचता किंवा ऐकताय यावर नियंत्रण ठेवा.*
या बातम्या सतत आणि ताबडतोब समजायलाच हव्यात असे बिलकुल नाही. विशेषतः जर बातम्या किंवा व्हिडिओ बघणार असाल तर त्यामध्ये वाजणारे जे संगीत असते त्यामुळे देखील आपल्याला धडधडू शकते.
यापासून दूर राहणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे.
*2. मनामध्ये जेव्हा युद्ध संबंधी विचार येतील त्या वेळेला जाणीवपूर्वक इतर विचारांनी मन गुंतवा.*
यासाठी थोडा प्रयत्न करायला लागेल मात्र हे जमू शकेल.
*3. सखोल किंवा दीर्घ किंवा संथ श्वसन करण्याचा प्रयत्न करा.*
जेव्हा मनात भीती वाटते त्यावेळेला संथगतीने श्वसन करणे मदत करू शकते.
*4. मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना ते केवळ विचार आहेत सत्य नव्हे हे समजून त्यात गुंतणे टाळा.*
विचारांना ते नकारात्मक विचार आहेत की सकारात्मक असे लेबल देता आले तर त्यांना स्वीकारणे किंवा नाकारणे शक्य होते.
*5. सर्कल ऑफ कंट्रोल ही संकल्पना सतत वापरा.*
मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी एक सर्कल ऑफ कंट्रोल अशी संकल्पना आहे, ज्यामध्ये कोणतीही घटना किंवा विचार ही माझ्या स्वतःच्या आवाक्यात आहे का हा विचार सतत करायचा आणि जर ती घटना किंवा विचार आपल्या आवाक्यातील नसेल तर त्यावर वेळ न घालवता आपल्या आवाक्यातल्या गोष्टी शोधून त्या करणे हे समाविष्ट असते.
युद्ध सुरू करणे माझ्या हातात नाही, ते थांबवणे देखील माझ्या हातात नाही. मात्र युद्ध सुरू असताना जो जो प्रसंग सामोरा येईल तो तो प्रसंग लगेच स्वीकारून योग्य ती कृती करणे हे मात्र माझ्या हातात आहे.
त्यामुळे येईल तो प्रसंग मी सामोरा किंवा सामोरी जाईन एवढेच स्वतःला समजवायचे आणि सर्व चांगले होईल अशीच अपेक्षा करायची.
*6. मानसिक आरोग्य जपण्यासाठी प्रयत्न करा.*
यामध्ये वेळेवर व पुरेशी झोप घेणे, निसर्गामध्ये फिरायला जाणे, नियमित व्यायाम करणे, सकस अन्न व पुरेसे पाणी घेणे या कृती समाविष्ट आहेत.
*7. मानसिक बळ वाढवणाऱ्या व्यक्तींसोबत संपर्क ठेवा.*
ज्या व्यक्ती मानसिक ताणतणाव समजू शकतील तसेच यामध्ये आपल्याला मदत करू शकतील अशा व्यक्तींसोबत संपर्क ठेवा. त्यांना आपल्या मनातील भावना सांगा.
*8. हेल्पलाइन किंवा तज्ञांची मदत घ्या.*
आवश्यकतेनुसार जेव्हा त्रास असेल त्या वेळेला विविध हेल्पलाइन किंवा मानसोपचार तज्ञ यांची मदत अवश्य घ्या.
Covid-काळानंतर सर्वांचे मानसिक आरोग्य थोडेसे अशक्त आहे. अर्थात आपण सर्वच खूप मोठ्या जीवावरच्या संकटावरून वाचलेले आहोत . त्यामुळे हे अपेक्षितच आहे.
त्यामुळे एकमेकांची काळजी घेणे, तसेच स्वतःचीही काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे.
नेहमी सांगते तेच पुन्हा सांगेन की योग्य माहिती ही बळ देणारी असते . त्यामुळे आपण कोणती माहिती स्वीकारत आहोत याकडे डोळसपणे पहा व स्वतःच्या मनाला बळ देणारी माहिती अधिक प्रमाणात स्वीकारा.
डॉ प्रिया प्रभू, MD PSM, GMC Miraj.
drprdeshpande2@gmail.com
ही माहिती इतरांपर्यंत अवश्य पोहोचवा कारण याची कोणाला गरज असेल हे आपण सांगू शकत नाही.

माझे WA channel देखील follow करू शकता . लिंक
लेखामध्ये उल्लेख केलेल्या लिंक पुढीलप्रमाणे –
War anxiety info link
मुलांशी युद्धाबद्दल कसे बोलावे हे सांगणारी पुस्तिका लिंक




Leave a Reply