AMR – नकळत पसरलेले pandemic

Written by:


माझ्या वडिलांच्या मृत्यूमागे जी बरीच कारणे होती त्यातील एक प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष कारण AMR हे देखील होते.  त्यामुळे हा विषय जवळून अनुभवला आहे. AMR मुळे येणारी असहाय्यता अनुभवली आहे.

याविषयी गेली दीड वर्षे मला लिहायचे होतेच, पण काल IMA Miraj तर्फे या विषयावर एक परिसंवाद ऐकला आणि जाणवले की जर आपण एकत्रितपणे काही कृती करू शकलो तर भविष्याविषयी थोडेफार आशावादी राहता येईल.

AMR ला Silent Pandemic म्हटले जाते.
हे अतिशय योग्य वर्णन आहे.

ही महासाथ आहे

कारण
✓ संपूर्ण जगभरात कमी अधिक प्रमाणात याचे परिणाम जाणवत आहेत.
✓ एका देशामध्ये जर याचा प्रभाव वाढला तर तो त्याच देशामध्ये राहील असे नाही. कारण जंतूंना देशाच्या सीमा समजत नाहीत.
✓ याचा वाढता प्रभाव देशांमध्ये आर्थिक परिणाम घडवून आणू शकतो.
✓ २०१९ मध्ये जगभरात २० लाख व्यक्ती याने मृत्यू पावल्या आणि २०५० मध्ये ही संख्या वाढून १ करोड असू शकते. 
✓ याचे नियंत्रण करण्यासाठी सर्वांना एकत्रितपणे काम करावे लागणार आहे.
✓ यामध्ये केवळ एका सूक्ष्म जंतूचा प्रभाव नसून जवळ जवळ सर्वच सूक्ष्मजंतू AMR मुळे बळकट होऊन संसर्ग फैलावू शकतात.

ही महासाथ सायलेंट म्हणजे नकळत / चाहुलीविना पसरत आहे .

कारण
✓ याच्यामुळे होणारे मृत्यू कधी प्रत्यक्ष कारणाने असतात तर कधी अप्रत्यक्ष कारणे असतात.  त्यामुळे याचा पूर्ण प्रभाव आपल्या लक्षात येत नाही.
✓ याविषयीचा धोका जनता तर जाणत नाहीच पण पूर्ण वैद्यकीय क्षेत्र देखील याचा आवाका व आरोग्यावरील परिणाम याचे महत्त्व जाणत नाही. त्यामुळे नियंत्रणाच्या कृती अजूनही म्हणाव्या तितक्या तीव्रतेने केल्या जात नाहीत.
✓ ही साथ सर्व प्रकारच्या जंतूंशी संबंधित असल्याने हे सूक्ष्मजीव नकळतपणे कोणालाही संसर्गित करू शकतात. एखादे साधे इन्फेक्शन देखील जीवघेणे ठरू शकेल.

२०१५ मध्ये WHO ने AMR हे जागतिक आरोग्य संकट असल्याचे जाहीर केले होते व ग्लोबल ॲक्शन प्लॅन देखील तयार केला होता. तेव्हापासून प्रत्येक देश यावर काही ना काही काम करत आहे. मात्र या कृती ‘एखादी महासाथ थांबवण्यासाठी ज्या वेगाने व्हायला हव्यात तसेच सर्वांचा समावेश असणाऱ्या हव्यात’ तशा आहेत असे जाणवत नाहीत.

गेली अनेक वर्षे मी माझ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना याविषयी जागृत करत असते. पण ते तर भविष्य आहेत, जे परिणाम भोगणार आहेत. जागृतीची गरज सध्याच्या पिढ्यांना आहे.

आपल्या मुलाबाळांना आरोग्यपूर्ण जीवन मिळावे यासाठी आपल्याला कृती तर आत्ताच करावी लागणार आहे. इतर देशांमध्ये याबाबत जागृती व कृती अधिक प्रमाणात घडत असते. भारतासाठी आपल्या सर्वांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत.

AMR विषयी काल आशादायी वाटले.

कारण
✓ मिरजच्या वैद्यकीय संघटनेने एकत्रित कृतीबाबत हालचाल सुरू केली आहे. असे इतरत्र देखील घडू शकेल ही आशा जाणवली. 
✓ भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील कृती आराखडा समजला. सातत्यपूर्ण प्रयत्नाने काही बदल होऊ शकतो हे जाणवले. 
✓ केरळ मॉडेल बाबत माहिती समजली. जर सरकारने ठरवले तर राज्यस्तरीय बदल देखील घडवता येतात हे दिसले.

म्हणून आज पासून ही नवी सिरीज सुरू करत आहे. याविषयीच्या पोस्ट रोज असतील असे नाही मात्र हळूहळू हा विषय देखील आपण समजून घेऊया. याविषयी वाचायला,  समजून घ्यायला तुम्हाला आवडेल ना? याविषयीचे काही प्रश्न असल्यास कमेंट मध्ये शेअर करा.

सर्वात महत्त्वाचे तर सांगायचे राहिलेच.

AMR म्हणजे Antimicrobial resistance.

सर्व प्रकारच्या सूक्ष्मजीवांमध्ये म्हणजे जिवाणू, विषाणू, कवक व प्रतिजीवी या सर्वांमध्ये औषधांबाबत म्हणजे प्रतिजैविकांबाबत जो प्रतिरोध निर्माण झाला आहे तो जीवघेणा ठरणार आहे, ठरत आहे.

याविषयी अधिक माहिती मी लिहीत राहीनच.  कारण जर ही महासाथ असेल तर आपल्या सर्वांना याविषयी अधिकाधिक माहिती असणे, तसेच काय कृती करायला हवी हे समजणे अतिशय महत्त्वाचे आहे.

नेहमीप्रमाणे ही माहिती तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवाल ही आशा.
या युद्धात आपल्या सर्वांची एकजूट महत्वाची आहे.

(याला मी युद्ध का म्हणते याविषयी पुढील पोस्ट मध्ये सांगेन)

– डॉ प्रिया प्रभू, MD PSM
GMC, Miraj
(२६/४/२५)
@DrPriya Insights

#Together_against_AMR_DrPriya 1

Feel free to share .


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.