चीनमधील आजार HMPV धोकादायक आहे का?

Written by:

(पोस्ट ऑडिओ स्वरूपात ऐकायची असल्यास लिंक शेवटी आहे)

आज सर्वत्र चीनमधील नव्या आजाराबाबत बातमी आहे. काहीजण त्यामुळे घाबरले असतील. काहीजण चिडले असतील. काहीजण हसत असतील.

मात्र अशी कोणतीही बातमी येते तेव्हा त्याने घाबरून न जाता ती योग्य प्रकारे समजून घ्यायला हवी. चला तर मग आपण आपले टेक्निक वापरून बातमी समजून घेऊया.

एखाद्या बातमीने मनामध्ये नकारात्मक भावना आल्या की मग थोडे थांबायचे, खोल श्वास घ्यायचा, आणि त्याविषयी अधिक माहिती घ्यायची.
किंवा एखाद्या खात्रीशीर स्त्रोताकडून ती माहिती तपासून घ्यायची.

१. चीनमधील बातमी एखाद्या संघटनेच्या मार्फत आली आहे का?

नाही .
ही बातमी एका ट्विटर अकाउंटने पोस्ट केली आहे आणि त्या एका ट्विटर पोस्ट वरून सर्व माध्यमे ही बातमी देत आहेत. त्या ट्विटर पोस्टमध्ये एक फोटो आणि एक व्हिडिओ जोडलेला आहे, ज्यामध्ये दवाखान्यामध्ये मास्क लावलेल्या लोकांनी गर्दी केलेली दिसत आहे.

२. अशी एखाद्या नागरिकाकडून आलेली बातमी बिलकुल महत्त्वाची नसते का?

अशा बातम्यांच्या बाबतीमध्ये आपण कितपत खात्री ठेवू शकतो याविषयी शंका असते. मात्र जेव्हा आपण एखाद्या नव्या आजारांबाबत अशी एखादी बातमी बघतो, त्या वेळेला त्या बातमीकडे पूर्ण दुर्लक्ष करणेही योग्य नसते. कारण बऱ्याचदा काही देश असे आजार लपून ठेवू शकतात आणि सर्वप्रथम येणारी माहिती ही बऱ्याचदा अशा एखाद्या सोशल मीडियाची पोस्ट असू शकते.

३. HMPV हा कोविड सारखाच एखादा नवा आजार आहे का?

नाही.
हा विषाणू सर्वप्रथम 2001 मध्ये सापडला / ओळखला होता मात्र त्यानंतरच्या अभ्यासांमध्ये असे लक्षात आले की हा विषाणू तत्पूर्वी 50-60 वर्षे पासून जगभरामध्ये प्रसार पावलेला आहे.
जगभरातल्या विविध देशांमध्ये जनतेमध्ये या विषाणूविरुद्ध antibodies सापडल्या आहेत.

एखादा आजार मुख्यतः केवळ मुलांमध्ये तेव्हाच दिसून येतो जेव्हा सर्वसाधारण जनतेमध्ये त्याचे अँटीबोडीज उपलब्ध असतात. आणि चीनमधील परिस्थिती सध्या केवळ लहान मुलांमध्येच सर्वाधिक आजार दिसत आहे असे सांगत आहे. याखेरीज वृद्ध व्यक्ती आणि ज्यांची इम्युनिटी कमी आहे अशा व्यक्ती यांनाही आजार होत आहेत असे सांगितले जात आहे.

४. जर हा विषाणू नवा नसेल तर त्यामुळे जागतिक महासाथ येऊ शकते का?

एखाद्या जुन्या विषाणू पासून कोविड सारखी महासाथ येण्याची शक्यता अतिशय कमी असते .
केवळ जुन्या विषाणूमध्ये काही मोठे जनुकीय बदल झाले तरच असे घडू शकते.
मात्र अशी शक्यता बातम्यावरून वाटत नाही.
नोव्हेंबर २०२३ मध्येही चीनमध्ये मुलांमधील निमोनिया वाढत होता मात्र तशा केसेस इतर कोठे झाल्या नाहीत.

५. HMPV मुळे कोणता आजार होतो?

HMPV म्हणजे Human MetaPneumo Virus.
नावानुसार हा विषाणू मुख्यतः पक्षांमधील AMPV या विषाणूशी संबंधित आहे.
याचे A आणि B असे प्रकार आणि त्या प्रत्येकाचेही 1 आणि 2 असे उपप्रकार आहेत.

या विषाणू ने मुख्यतः सर्दी खोकला सदृश्य आजार होतो. काही जणांमध्ये हा गंभीर होऊन निमोनिया होऊ शकतो. आजार गंभीर झाल्यास मृत्यूचा धोका वाढतो. RSV विषाणू सदृश्य लक्षणे यामध्ये दिसू शकतात.

हा गंभीर आजार नसल्याने गेल्या 25 वर्षात याबद्दल कोणतीही लस निर्माण झालेली नाही तसेच हा विषाणूजन्य आजार असल्याने याविषयीचे कोणते औषध देखील उपलब्ध नाही.
लसीबाबत संशोधन सुरू आहे.

या आजाराविषयी व बातम्याविषयी काही लिंक्स कमेंटमध्ये देईन.

६. अशा केसेस चीनमध्ये का वाढत आहेत?

जे आजार हवेद्वारे, बाधित वस्तूंद्वारे, श्वसन मार्गाद्वारे पसरणारे असतात- असे सर्व आजार हे थंडीच्या दिवसांमध्ये वाढतात. विशेषतः ज्या देशांना समशितोष्ण देश असे समजले जाते, अश्या देशांमध्ये हे आजार सीजनल असतात. थंडीच्या काळामध्ये फ्लू व तदृश्य आजार अधिक असतात.

या देशांमध्ये बर्फ पडत असल्याने/ तापमान खूपच कमी होत असल्याने सहसा या काळात सर्व घरे ही बंदिस्त असतात. खिडक्या उघड्या नसतात. हवेचे वायूविजन कमी झालेले असते . त्यामुळे अशा श्वसन मार्गाच्या आजारांचा फैलाव याच काळात अधिक होतो.

प्रत्येक देशांमधील वातावरण तसेच परिस्थिती वेगळी असल्याने एखादा आजार एखाद्या देशामध्ये वाढला तर तो इतर देशांमध्ये लगेच वाढेल असे नाही.

७. त्या ट्विटमध्ये काही विसंगती आहे का?

त्या ट्विटमध्ये सुरुवातीला हा आजार लहान मुलांमध्ये व अति वृद्ध व्यक्तींमध्ये दिसून येतो असे म्हटले आहे आणि त्यानंतर जेव्हा मृत्यूचा उल्लेख केलाय त्या वेळेला मात्र 40 ते 60 वयोगटातील लोकांमध्ये अधिक मृत्यू झालेत असे सांगितले आहे.

त्याचप्रमाणे गर्दीचा जो व्हिडिओ दाखवला आहे त्यामध्ये दिसणारे रुग्ण हे गंभीर आजारी असतील असे वाटत नाही. लहान मुलांना दवाखान्यात आणताना सोबत पालक येतात आणि त्यामुळे थोडी गर्दी जास्त आहे असे वाटते.

त्याचप्रमाणे लोकांनी केवळ सर्जिकल मास्क लावला आहे. जर हा जास्त गंभीर आजार असता तर त्यांना N-95 मास्क लावण्यास सांगितले गेले असते.

८. मग याबाबत आता काय काळजी घ्यायला हवी?

१. सर्वप्रथम अशा एखाद्या ट्विटमुळे घाबरून न जाता अधिकृत साइटवरून काय माहिती मिळते याची वाट बघायला हवी.

२. माध्यमांनी याविषयी बातमी करताना एकांगी माहिती न देता इतरही माहिती द्यायला हवी, जेणेकरून विनाकारण घबराट पसरणार नाही.
अन्यथा जेव्हा खराच एखादा नवा आजार निर्माण होईल त्या वेळेला लोक योग्य ते लक्ष देणार नाहीत.

३. सध्या उपलब्ध माहितीनुसार हा आजार सर्दी खोकल्यासारखा आहे असे दिसून येते.
त्यामुळे अशा आजारांपासून कसे सुरक्षित राहायचे हे आपल्या सर्वांना आता माहीतच आहे.
‘ बाहेरून आल्यावर हात धुणे , बाहेर असताना इतरत्र हात न लावणे आणि आपले हात नाकातोंडाजवळ, डोळ्याजवळ न नेणे’ – या चांगल्या सवयी असल्यास सर्दी खोकल्यासारख्या आजारांपासून सुरक्षा मिळू शकते.

ज्यांना सर्दी खोकला आहे अशा मुलांना शाळेत न पाठवणे, इतर मुलांबरोबर खेळायला न पाठवणे, मोठ्यांनी सर्दी खोकला असल्यास मास्क लावणे या साध्या गोष्टी देखील असे आजार फैलावण्यापासून सुरक्षा देतात. या गोष्टी आपण नेहमीच करायला हव्यात.

४. कोणत्याही आजारात ज्यांची इम्युनिटी चांगली असते त्यांना कोणताही धोका नसतो.
त्यामुळे फळे भाजीपाला खाणे, प्रथिने खाणे , व्यायाम करणे , पुरेशी झोप घेणे हे महत्त्वाचे.
त्याचबरोबर इतर काही आजार असल्यास त्यांना नियंत्रित ठेवणे हेही महत्त्वाचे.
काही व्यसने असल्यास ती बंद करणे महत्त्वाचे
आणि
जर इम्युनिटी कमी असेल तर मात्र थोडी अधिक काळजी घेणे महत्त्वाचे.

५. सर्वात मोठी जबाबदारी डॉक्टरांची आहे. या आजाराबाबत जी खात्रीशीर माहिती उपलब्ध होत राहील त्यावर लक्ष ठेवून जर अशा प्रकारचे रुग्ण आढळून येत असतील तर अशावेळी तातडीने त्याविषयी रिपोर्टिंग करणे हे आवश्यक आहे.
तसेच जर या विषयी काही तपासणीसाठी सूचना सरकारकडून मिळाल्या तर त्यावेळी त्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

९. मग ही बातमी मिसइन्फॉर्मेशन म्हणायची का?

ही बातमी एका ट्विट बद्दलची आहे पण जर केवळ मथळा वाचला तर मात्र आपल्याला हे समजून येत नाही. त्यामुळे थोडे गैरसमज होऊ शकतात.
त्यामुळे कोणतीही बातमी केवळ मथळा वाचून समजून घ्यायची नाही तर संपूर्ण बातमी वाचून ती नक्की कोणत्या स्त्रोतावरून निर्माण झाली आहे हेही समजून घेणे आवश्यक आहे.

या अशा बातम्या जेव्हा जेव्हा येत राहतील तेव्हा तेव्हा आपले ठरलेले नियम वापरत राहायचे आणि बातमीतील तथ्य ओळखण्याची आपली क्षमता वाढवत राहायची.
मिळालेली योग्य शास्त्रीय माहिती देखील विविध ग्रुपमध्ये शेअर करत राहायची. माहिती केवळ स्वतःजवळ ठेवून काही उपयोग नसतो .

याविषयी आपल्या मुलांसोबतदेखील अवश्य चर्चा करा आणि एखादी बातमी कशी समजून घेता येऊ शकते हेही त्यांना शिकवा. भविष्यात त्यांना खूप गरज पडणार आहे.

  • डॉ. प्रिया प्रभू, GMC, मिरज
    (साथरोग तज्ञ ) MD PSM
    (३/१/२५)

https://youtu.be/kMPHaUL4tFI?si=Q3Gw-XEliarY9dyf

https://open.spotify.com/episode/5FuM5vlTPd22EyOeLzOnIq?si=l1uXvOkcSgOODj3j1QouUg&context=spotify%3Ashow%3A5bvnUW4WpztNr0ZKz9HONP

अश्या विविध विषयावरील माहितीपूर्ण पोस्ट साठी fb profile फॉलो करा.

https://www.facebook.com/share/1B7XqvLQKa/


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.