
बाळ जसजसे वाढू लागते तसतशी आईच्या मनात शंका निर्माण होते की बाळाला आपले दूध पुरतंय की नाही.
याची बरीच कारणं असू शकतात. महत्त्वाचं कारण आहे की बाळ वारंवार दूध प्यायला मागतेय म्हणून आईला शंका येते . दुसरं महत्त्वाचं कारण आहे की बाळ सारखं रडतं किंवा दूध पिल्यानंतर जास्त वेळ झोपत नाही, म्हणून आईला तसे वाटू शकते. कधी बाळ किरकिरे होते .
पण आई असा विचार करतंच नाही की “आपलं दूध कमी झालेलं नसून बहुदा बाळाची भूक वाढली असेल का?”
असे घडू शकते, कारण बाळ वाढताना काही ठराविक काळाच्या टप्प्यांमध्ये बाळामध्ये जलद वाढ म्हणजे Growth Spurt होत असतात. बाळाची वाढ रोज रोज थोडी थोडी न घडता टप्प्याटप्प्याने व काही आठवड्याच्या अंतराने घडत असते.
ही Growth Spurt बाबत महत्त्वाची माहिती आपल्याला नसल्याने जेव्हा जेव्हा बाळाची जलद वाढ होते आणि बाळाचे वागणे बदलते तेव्हा तेव्हा पहिली शंका मात्र “आईच दूध पुरतंय का ?” अशीच मनामध्ये येते आणि त्यामुळे विनाकारण वरचे दूध सुरू केले जाते आणि मग असे केल्याने आईचे दूध हळूहळू कमी होते.
प्रत्येक बाळ वेगळे असले तरी पहिल्या वर्षभरात ग्रोथ स्पोर्ट येण्याच्या सर्वसामान्य वेळा पुढील प्रमाणे आहेत साधारण पहिले सात ते दहा दिवस किंवा दुसरा आठवडा, चौथा ते सहावा आठवडा, तिसरा महिना, सहावा महिना, नववा महिना, आणि बारावा महिना.

ग्रोथ स्पर्ट शारीरिक वाढीचे असू शकते किंवा बाळाने एखादी नवी गोष्ट शिकली असेल तर त्याच्या मेंदूच्या वाढीचाही ग्रोथ स्पर्ट असू शकतो.
बाळ ग्रोथ स्पर्ट मध्ये आहे हे कसे ओळखावे?
Growth Spurt मधील बाळे सहसा दूध पिण्यासाठी वारंवार मागणी करतात. काही बाळे जरी दूध पिले असेल तरी पुन्हा पुन्हा पिण्यासाठी मागतात ज्याला क्लस्टर फीडिंग असे म्हणतात. काही मुलांची झोप ही कमी होऊ शकते त्यामुळे ते सारखे उठतात. बाळ किरकिरे बनू शकते. या लक्षणांमुळे असे वाटते की बाळाचे पोट भरतच नाहीये आणि आई चिंतीत होते.

त्यामुळे बाळाचे वागणे, खाणे पिणे, झोपेचा प्रकार अचानक बदलले तर अशावेळी चिंतित होऊ नका. आपल्याला बाळाला ‘ डिमांड फीडिंग’ द्यायचे आहे म्हणजे जेवढ्या वेळा बाळ प्यायला मागेल तेवढ्या वेळा आणि जेवढा वेळासाठी बाळ मागेल तेवढ्या वेळासाठी. त्यामुळे बाळाला हवे तेवढ्या वेळेला दूध पिऊ दिले की ग्रोथ स्पर्ट जेव्हा संपतो तेव्हा बाळ पुन्हा शांत होतं . तोपर्यंत आईचं दूध देखील वाढतं आणि बाळाची गरज ही पूर्ण होते.
तुमचे प्रश्न कमेंट मध्ये अवश्य विचारा तसेच या ब्लॉगला सबस्क्राईब करा म्हणजे नव्या पोस्ट तुम्हाला इमेल मध्ये समजतील.
– डॉ प्रिया प्रभू
Miraj

Leave a Reply