सीझर झाले तर दूध कमी असते का ?

एका वाचिकेने मेसेज केला म्हणून आज ही पोस्ट सीझरनंतरच्या स्तनपानाबद्दल.

ज्यांचे सीझर झाले आहे त्यांना विचारले तर त्या स्त्रिया सीझर नंतर स्तनपानाबाबत अडचणी आल्या असेच आपल्याला सांगतील. जर गरोदर असताना स्तनपान विषयक सर्व माहिती मिळवली व तयारी केली तर अचानक सीझर करावे लागले तरीही स्तनपानाचा अनुभव चांगला असू शकतो.

मात्र सीझर झाले असेल तर त्या मातेला स्तनपानासाठी पार्टनरकडून ,कुटुंबाकडून व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून अधिक साहाय्य आवश्यक असते.

तुम्ही माझ्या आधीच्या पोस्ट वाचल्या असतील तर स्तनांमध्ये दुधनिर्मिती बाळाच्या जन्मापूर्वी सुरू झालेली असते हे तुम्ही वाचलेच असेल. म्हणजे बाळाचा जन्म योनीवाटे झाला की ऑपरेशनद्वारे हे ठरण्यापूर्वीच स्तनांमध्ये दूध , खरे तर चीक दूध तयार असते .

हे चीक दूध बाहेर काढण्यासाठी एक एक्स्पर्ट आवश्यक असतो. तो एक्स्पर्ट म्हणजे तुमचे बाळ! देवाने (निसर्गाने) त्याला वेगवेगळ्या प्रतिक्षिप्त क्रिया शिकवून पाठवलेले असते ना ! निप्पल चोखणे या क्रियेने let down रिफ्लेक्स कार्यान्वित होऊन चीक दूध बाहेर पडते.

म्हणजे सीझर नंतर स्तनांमध्ये दूध आहे की नाही याची चिंता न करता बाळाला लवकरात लवकर स्तनपान देण्यासाठी जवळ घेणे आवश्यक आहे ! शक्यतो १ तासामध्येच! (पूर्वी सीझर झाले की ४ तास थांबायचे पण आता तशी वाट बघायची गरज नाही! ) सीझर वेळी आजकाल सहसा पूर्ण भूल न देता spinal म्हणजे मणक्यातील भूल देतात. त्यामुळे बाळाला जन्मानंतर १ तासात स्तनपान सुरू करणे शक्य आहे! तुमचे डॉक्टर जर skin to skin जाणत असतील तर थोड्या प्रयत्नाने तो अनुभव सीझर नंतर देखील घेता येतो.

सीझर नंतर ऑपरेशनची जखम दुखत असते, कधी डोके प्रचंड दुखते, उठून बसता येत नाही, मांडी घालता येत नाही . अश्या वेळी बाळाला स्तनाला लावण्याच्या कामी इतर कुटुंबीय मदत करू शकतात. पुढील प्रकारे (होल्ड द्वारे) बाळ स्तनाला लावता येईल.

आई उठू शकत नसेल तर झोपून पाजता येते. ( नेहमी प्रमाणे पोटाशी बाळ घेऊन किंवा inverted म्हणजे बाळ डोक्याशी उलटे झोपलेले) किंवा laid back पोझिशन वापरून ज्यामध्ये आई मागे रेलून निवांत बसलेली असते. आई उठून बसू शकत असेल तर फुटबॉल होल्ड म्हणजे बाळ आईच्या हाताखालून झोपलेले असताना स्तनाशी लावता येते. (होल्ड बद्दल पोस्ट लिहिलीये की नाही बघावे लागेल! )

काही कारणाने बाळाला स्तनाशी घेऊन पाजणे शक्य होत नसेल तरी लवकरात लवकर स्तनातून चीक बाहेर काढणे सुरू करावे लागते म्हणजे लवकर येते दूध. जन्मानंतर प्रत्यक्ष पाजल्याने किंवा हातांनी दूध काढून स्तन दर दोन तासांनी रिकामे व्हायला हवेत. (न दुखवता हातांनी दूध कसे काढायचे त्याविषयी एक पोस्ट लिहीन) त्यामुळे बाळ पीत असेल तर प्रत्येक २ तासांनी उठवून स्तनाला लावणे म्हणजे दूध लवकर येते . ( चिकदूध अतिशय पौष्टिक असल्याने चमचाभर मिळाले तरी बाळाचे पोट भरते) स्तन नियमितपणे रिकामे झाले की नवीन दूध येत रहाते.

सिझरमुळे दोन गोष्टी होतात-

१. ओटीपोटाला दिलेल्या टाक्यांमुळे आईने बाळाला घेताना खूप जपून घ्यायला हवे, सुरुवातीच्या काळात पाजताना बाळाचे वजन पूर्णपणे पोटावर येता कामा नये . वरील फोटोनुसार बाळाला धरता येते . आई बाळाला जवळ धरू शकत नसेल तर इतरांनी धरावे.

२. सीझर वेळी आईला बरेच सलाईन लावलेले असू शकतात , त्याने शरीरातील व पर्यायाने स्तनातील पाणी वाढते. तसेच काही वेळा स्तन दाटलेले असल्याने थोडे कडक असू शकतात. निपलचा भाग देखील ताणला गेल्याने बाळ स्तन चोखू शकत नाही, latch व्यवस्थित होत नाही. यासाठी Reverse Pressure Softening ने स्तनाग्रे थोडी मऊ बनवता येतात. आणि मग बाळाला स्तनाशी लावावे.

३. बाळाला शक्यतो आईचे दूध प्रत्यक्ष किंवा काढून द्यावे . मात्र बॉटल वापरू नये, निप्पल कन्फ्युजन होऊ नये यासाठी !

४. अधून मधून फॉर्म्युला किंवा इतर प्राणिज दूध (शक्यतो टाळावे , अलर्जीज चा धोका वाढतो) दिल्यास ते पचवण्यासाठी अधिक वेळ लागतो व बाळ जास्त वेळ झोपते. त्यामुळे स्तन वारंवार रिकामे होत नाहीत व दुध कमी होऊ लागते. त्यामुळे वरचे दूध सुरू करणार असाल तर स्तनातील दूध कमी होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्या . स्तन नियमितपणे रिकामे करा (हाताने किंवा पंप वापरून) म्हणजे दूध निर्मिती कमी होत नाही.

या सर्व बाबींकडे पुरेसे लक्ष न दिल्याने बऱ्याच मातांना सीझर नंतर स्तनपान सुरू करताना व पुरेसे दूध तयार होईपर्यंत खूप साऱ्या तणावाला सामोरे जावे लागते आणि तणाव दुधाला मारक आहे हे आपण जाणतोच! स्वतःच्या शरीरावर विश्वास ठेवा , जे शरीर नऊ महिने बाळाचे पोषण करते ते शरीर दूध नक्कीच तयार करू शकते! आत्तापर्यंत जरी वरच्या दुधाने आईचे दूध कमी झाले असेल तरी आजपासून तुम्ही स्वतःचे दूध वाढवून वरचे दूध कमी करू शकाल (मला तिसऱ्या महिन्यानंतर योग्य माहिती मिळाली व त्यानंतर मला चांगल्या प्रकारे स्तनपान देता आले ! ) बाळाचे योग्य latch, milk transfer होतेय याची खात्री आणि स्तन नियमितपणे रिकामे करणे या त्रिसूत्रीने सर्व माता त्यांच्या मर्जीनुसार स्तनपान देऊ शकतात!

जन्मानंतर बाळामध्ये गुंतागुंत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने आईचे दूध देता येते. बाळ जवळ नसले व लगेच आईचे दूध द्यायचे नसेल तरीही जन्मानंतर २ तासांनंतर दर दोन तासाने स्तनातून दूध काढत राहा , ते साठवून स्वतःच्या किंवा इतर कोणाच्या बाळाला देता येईल. आणि हो, स्तनपान व्यवस्थित सुरू होईपर्यंत स्तन रात्री देखील रिकामे करायचे बरं का!

बाळाचा जन्म ही मोठी आनंदाची घटना आहे! जरी जन्म सीझर करून झाला असेल तरीही इतरांच्या सहकार्याने व नियमितपणे स्तन रिकामे करून माता दुधाचे प्रमाण वाढवू शकते! सुरवात मात्र लवकरात लवकर करा !

अधिक माहिती पुढील लिंक मध्ये वाचू शकता :

https://llli.org/breastfeeding-info/breastfeeding-cesarean-birth/

डॉ. प्रिया प्रभू (४/१०/२०२३)


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com